Ad will apear here
Next
झेलताना चांदवा
‘गझल माझा श्वास आहे, गझल माझी आस आहे - गझल माझा ध्यास आहे, गझल माझी प्यास आहे! शब्द माझे मौन होता अर्थ होती बावरेसे, मी तरीही या गझलचा दोस्त आणि दास आहे!’ – अशा अत्यंत मनभावन शब्दांत आपलं गझलेशी असणारं नातं उलगडून दाखवणारे गझलकार सुधीर न. कुबेर यांचा ‘झेलताना चांदवा’ हा जरूर वाचावा आणि रंगून जावा असं गझलसंग्रह! त्याविषयी...
...................
दोन दोन पदांची एकाच वृत्तामध्ये, सुंदर छंदोबद्ध रचना म्हणजे गझल! असं म्हणतात, की गझल ही एक वृत्ती असते. प्रेमाच्या कथेबरोबरच विरहाची व्यथादेखील ताकदीने मांडणारी वृत्ती. गझलरचना हा प्रकार मुळात कठीण. एखादी मात्र कमी-जास्त झाली, तरी तोल बिघडतो आणि जाणकार रसिकाला ऐकताना, वाचताना अडखळल्यासारखं होतं. पूर्वीच्या काळी गझल ही प्रेमाभोवती घोटाळत असे; पण आजच्या जगात मात्र गझलेला कोणताही विषय वर्ज्य नसतो. उर्दू भाषेचा हा मोठा दागिना आणि परंपरा थेट १३व्या शतकापासूनची. म्हणजे अमीर खुस्रोपासून चालत आलेली. मग त्यात पुढे मीर, बहादूरशाह जफर, आतिश, गालिब, दाग देहलवी, हसरत मोहानी, इक्बाल, जिगर मुरादाबादी, फैझपासून ते आपल्या परिचयाच्या जां निसार अख्तर, साहीर, कैफी आझमी, अहमद फराज, गुलजारपर्यंत अनेकांनी प्रचंड योगदान दिलेलं आढळतं. 

मराठीत माधवराव पटवर्धन (जूलियन) यांनी रुजवलेला गझल हा काव्यप्रकार ८०च्या दशकात लोकप्रिय झाला आणि तो मुख्यतः सुरेश भट यांच्यामुळेच! त्या सुमाराला अनेकांनी भटांचं शिष्यत्व पत्करलं होतं. त्यांपैकीच एक म्हणजे पुण्याचे सुधीर कुबेर. कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे त्यांच्या ८४ गझलांचा संग्रह ‘तू, मी नि ते’ नावाने २००२ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर १५ वर्षांनी सहा नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांच्या १९८ गझलांचा ‘झेलताना चांदवा’ हा नवीन गझलसंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फेच रसिकांसमोर आला आहे. कुबेर यांचे मित्र, सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी या संग्रहाला सुंदर प्रस्तावना लिहिली आहे आणि त्यातून त्यांनी मराठी भाषेतल्या गझलांच्या सद्यस्थितीवर भाष्य करत असतानाच कुबेर यांच्या गझलांविषयी कौतुगोद्गार काढले आहेत. त्यातलं एक विशेष म्हणजे कुबेरांनी काही ‘तरही’ गझला लिहिल्या हेत. ‘तरही’ म्हणजे एखाद्या गझलकाराच्या गझलेची एखादी ओळ घेऊन पुढे स्वतःची संपूर्ण नवी गझल लिहिणे. आणि हे करताना कुबेर यांनी त्या त्या कवींची नावं देण्याचं सौजन्य दाखवलं आहे. 

काही गझलांमध्ये त्यांनी खुबीनं स्वतःचं नावही गुंफलं आहे. उदाहरणार्थ – ‘घरट्यासहित जळले माझेच रान आता, वनवास जीवनाचा झाला निधान आता,’ या गझलेच्या शेवटाला ते म्हणतात –‘अजुनी ‘सुधीर’ माथी ओझे कुणाकुणाचे, तो भार पेलताना मोडेल मान आता.’

१९८ गझलांच्या या संग्रहात सुधीर कुबेर यांनी विविध विषय सहजतेने हाताळले आहेत. उदाहरणादाखल आजच्या आपल्या ‘लोकशाही’वरची ही त्यांची गमतीशीर टिप्पणी बघा –

‘हे आमदार झाले, ते खासदार झाले
ही धन्य लोकशाही, मतदार ठार झाले
कुरणे नवीनवी ती खाऊन फस्त केली
फुगले असे आता की धरणीस भार झाले
त्यांच्याविरुद्ध कोठे तक्रार नोंदवावी?
खाकीतले शिपाई त्यांचेच यार झाले
वर्णी जिथे तिथेही त्यांच्याच सोयऱ्यांची
जनता हमाल झाली, ते मालदार झाले
जगतो ‘सुधीर’ येथे साहून लोकशाही
मेंदू बधीर व्हावा इतुके प्रहार झाले’

आपलं आणि गझलेचं नातं त्यांनी वेगवेगळ्या शब्दांमधून मांडलंय. कधी ते लिहितात – ‘जशा वेदनाही पचू लागल्या, तशा रोज गझला सुचू लागल्या’, तर कधी म्हणतात -‘भर दुपारी गझल येते, तापलेले चंद्र देते.’....
कधी लिहितात -

नकोच दृष्टी लोचना दिसेल मग गझल,
हवी मनात वेदना सुचेल मग गझल
पुन्हा तुझाच चंद्रमा नभात यायचा
उगाच चांदण्यामध्ये जळेल मग गझल
‘सुधीर’ शोध थांबवी उगा इथे तिथे
तुझ्याच आसपास ती असेल मग गझल!’

....तर कधी लिहून जातात 

‘गझल माझा श्वास आहे, गझल माझी आस आहे
गझल माझा ध्यास आहे, गझल माझी प्यास आहे
शब्द माझे मौन होता अर्थ होती बावरेसे
मी तरीही या गझलचा दोस्त आणि दास आहे!’

या संग्रहातून सुधीर कुबेर यांचं गझलेवरचं प्रेम, निष्ठा तर दिसतेच; पण त्यांचा व्यासंग आणि वृत्तांवरची पकडही दिसून येते. मराठी गझलप्रेमी मंडळींनी आवर्जून वाचवा असा हा संग्रह आहे. 

झेलताना चांदवा 
लेखक : सुधीर न. कुबेर   
प्रकाशक : २१५९/२, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, ना. सी. फडके चौक, विजयानगर, पुणे-३०
पृष्ठे : २०३  
मूल्य : २२५ रुपये  

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZPNBI
 झेलताना चांदवा हे आक्रंदणारे आकाश आहे। जगण्यास दुःख बळ देत असेल तर तो सुखाचा पराभव आहे। आसव पदर नाते सांगणारी ही अनुभुती अस्वस्थ करत राहते।
Similar Posts
झुंज श्वासाशी आजारी माणसाला उपचाराच्या शेवटच्या टप्प्यांत ऑक्सिजनची गरज भासते; पण ज्याचे हॉस्पिटलमधले प्राथमिक उपचारच ऑक्सिजन घेऊन सुरू होत असतील त्याच्या आयुष्याची शाश्वती किती कठीण? ज्याला वयाच्या १६व्या वर्षीच त्यापुढचा प्रत्येक दिवस ‘बोनस’ असणार आहे, हे कळलं असेल, त्याच्या मनाची घालमेल इतरांना कशी कळावी? मुकुल
आत्ता नाही तर केव्हा...? स्मिता जयकर या बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री. बाहेरून बघता असे वाटते, की त्या एक वलयांकित जीवन जगल्या. परंतु त्यांचे आयुष्य असे घडले आहे, की त्यावर एखादा चित्रपट सहज निघू शकेल. त्यांना लागलेल्या स्वतःच्या आयुष्याच्या, अस्तित्वाच्या शोधाबद्दल त्यांनी पुस्तक लिहिले. नीला सत्यनारायण यांनी त्या पुस्तकाचा
नियतीचे प्रतिबिंब हातावरच्या रेषा, उंचवटे, बांधणी, स्पर्श, रंग, हाताचा आकार, तळहातावर असणाऱ्या विविध आकृत्या (फुल्या, चांदणी, साखळी, मत्स्य, डाग), बोटांची कमी-जास्त लांबी, एकमेकींना छेडणाऱ्या रेषा, रेषांचे वळसे या सर्वांचा आपल्या शरीर प्रकृतीशी, प्रारब्धाशी असणारा संबंध यातून प्रत्येक केस कशी हाताळली आणि हस्तरेषांचा अभ्यास
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language